
खानापूर : माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांच्याशी चर्चा करून इटगी येथील सरकारी शाळेचा प्रश्न सोडवला. त्यांच्या मध्यस्थीमुळे विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे आंदोलनही समाप्त झाले.
डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी इटगी येथे सरकारी शाळा सुरु केली होती. आणि नंतर ती हायस्कूलमध्ये रूपांतरित करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, काही अज्ञात व्यक्तींच्या शिफारशीमुळे ही शाळा घष्टोळ्ळी गावात हलवण्यात आली. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या इटगी ग्रामस्थांनी बंद पुकारून आंदोलन केले. डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतः गावात जाऊन या आंदोलनात सहभाग घेतला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही त्या आंदोलक मुलांसोबत बसून राहिल्या. त्यांनी शिक्षण आयुक्त आणि नंतर थेट शिक्षणमंत्र्यांशी संपर्क साधून दोन्ही शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली, ज्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला. “दोन्ही शाळांचा प्रश्न सोडवला जाईल,” असे आश्वासन मंत्र्यांनी माजी आमदारांना दिले. यावेळी मोबाईलचा स्पीकर सुरू असल्यामुळे उपस्थित सर्व आंदोलकांनी मंत्री आणि डॉ. अंजली यांच्यातील संभाषण ऐकले.मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ. अंजली यांनी सर्वांना सांगितले आणि त्यानंतर आंदोलन समाप्त झाल्याची घोषणा केली.यावेळी इटगीमधील ग्रामस्थांनी डॉ. अंजली यांचे आभार मानले.या प्रसंगी इटगी गावातील ग्रामस्थ, बीडीसीसी बँकेचे माजी संचालक अरविंद पाटील, कर्नाटक रक्षण वेदिकेचे सदस्य, शाळकरी मुले, गावातील महिला आणि वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta