बेळगाव : कर्नाटक सरकारने हाती घेतलेल्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणावेळी खानापूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी धर्म -हिंदू, जात -मराठा, उपजात -कुणबी आणि मातृभाषा -मराठी असे नमूद करण्याचे आवाहन खानापूरचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे.
जातीनिहाय जनगणने संदर्भात आज गुरुवारी पार पडलेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. मराठा समाजामध्ये विविध पोटजाती आहेत. त्यामुळे मराठा एकसंधतेचा अभाव आहे. आज सरकारच्या या सर्वेक्षणातून समाजाला एकत्र येण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे शासकीय विहित सर्वेक्षण अर्जावरील माहिती योग्य पद्धतीने भरून आपण सांगितलेली माहिती दिल्या पद्धतीने भरलेली आहे की नाही? याची खातरजमा करण्याचे आवाहन यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी केले. बैठकीमध्ये प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, अनंत पाटील, डी. एम. भोसले, पांडुरंग सावंत, रूक्माणा झुंजवाडकर आदींनी आपले विचार मांडले.
बैठकीस खजिनदार संजीव पाटील, पांडुरंग सावंत, अजित पाटील, राजाराम देसाई, कृष्णा कुंभार, ब्रह्मानंद पाटील, आप्पाराव मुतगेकर, मारुती परमेकर, जयराज देसाई, रवींद्र शिंदे, कृष्णा मनोळकर यांच्यासह खानापूर तालुका म. ए. समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta