

खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनेघाट-पालडा रस्ता क्रॉस जवळील पुलाखालील पाण्यात तरंगताना एका महिलेचा मृतदेह शनिवारी (रात्री) सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) अशी पटली आहे. त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पाटील या २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांच्या गावातील टेम्पोतून खानापूर तालुक्यातील केकेरी येथील जत्रेला गेल्या होत्या. जत्रा आटोपून परत येत असताना, रात्री साडेनऊच्या सुमारास त्या बीडी येथे उतरल्या. दुसऱ्या गाडीतून घरी येते, असे त्यांनी टेम्पो चालकाला सांगितले. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. बराच वेळ संपर्क न झाल्याने त्यांच्या मुलाने दुसऱ्या दिवशी नंदगड पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, शनिवारी रात्री महामार्गावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाने तिनेघाट पुलाखालील पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना पाहिला आणि तातडीने रामनगर पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला.
प्राथमिक तपासणीत, अश्विनी पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta