

बैलूर (ता. खानापूर) : मार्कंडेय नदीच्या उगमस्थानी वसलेल्या खानापूर तालुक्यातील बैलूर या गावात मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पारंपरिक पालवा सोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मे 2026 या वर्षी बैलूरसह बाकनूर, मोरब आणि देवाचीहट्टी या चार गावांची मिळून महालक्ष्मी देवीची यात्रा भरवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सहा महिने आगाऊ परंपरेनुसार विधिवत पूजा करून पालवे सोडण्याची परंपरा उत्साहात पार पडली. 15 वर्षांनंतर या गावची महालक्ष्मी यात्रा भरत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात बैलूर, बाकनूर, मोरब व देवाचीहट्टी या गावातील पंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत चौऱ्याऐंशी आद्यस्थळातील देवी-देवतांच्या पूजनाने झाली. त्यानंतर सातेरी माऊली मंदिराजवळ बैलूर गावचे भोमानदार आणि उपस्थितांनी हळद, कुंकू व तेल वाहून पालव्यांची पूजा केली. देवी महालक्ष्मीच्या यात्रेचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी सामूहिक गाऱ्हाणा घातला.
यानंतर हरिजन बांधवांच्या वतीने सवाद्य मिरवणुकीसह पालव्यांची गावभर फेरी काढण्यात आली. वाद्यांचा गजर, गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण गाव भक्तीभावाने न्हाऊन निघाले. प्रत्येक घरासमोर महिलांनी पालव्यांचे पूजन करून देवीचे स्वागत केले. या पारंपरिक सोहळ्यामुळे संपूर्ण बैलूर गावात उत्साह, आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ग्रामस्थ व पंचमंडळींच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या वेळी भोमानदार रवळू गुरव, पांडुरंग गुरव, विठ्ठल गुरव, कृष्णकांत बिर्जे, कोणेरी कांबळे, पांडुरंग कांबळे, विठ्ठल कांबळे यांच्यासह बैलूर गावचे पंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पालवा सोडण्याच्या कार्यक्रमानंतर आगामी महालक्ष्मी यात्रेच्या तयारीला प्रारंभ झाला असून, चारही गावांतील ग्रामस्थांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta