खानापूर : मलप्रभा नदीत पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली.
प्रथमेश रवींद्र पाटील (राहणार: लोकोळी) असे नदी पात्रात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.
बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या रवींद्रचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र, मिलिटरी भरतीसाठी आवश्यक असणारी उंची नसल्याने उंची वाढविण्यासाठी तो नित्यनेमाने धावणे आणि पोहण्यासाठी जात होता.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी तो घरी लहान भावाला सांगून मलप्रभेत पोहण्यास गेला होता. पण, रात्री साडे नऊ वाजले तरी नदीवर पोहायला गेलेला रवी घरी परतला नाही. यामुळे सारेच काळजीत पडले.
यावेळी घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी नदीकडे धाव घेतली. यावेळी नदीनजीकच्या रस्त्याशेजारी त्याची इलेक्ट्रिक दुचाकी व कपडे दिसले. त्यामुळे तो पोहोताना नदीत बुडाल्याचा संशय बळावला. तातडीने खानापूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली.
रात्र झाली असल्याने पाण्यात त्याचा तपास घेणे कठीण होते. आज शनिवारी सकाळी गावातील नागरिक व पोलीस घटनास्थळी हजर झाले. रेस्क्यू टीमला ही पाचारण करण्यात आले असून त्या युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे त्यांचे वडील रवींद्र नागोजी पाटील हे देखील निवृत्त सैनिक आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta