

जांबोटी : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून, कडकडीत हरताळ पाळावा, असे आव्हान खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंगळवारी जांबोटी येथे करण्यात आले.
यावेळी जांबोटी बस स्थानक तसेच बाजारपेठेत जागृती फेरी काढून घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप करून मराठी भाषिकांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच शनिवारी काळ्यादिनानिमित्त खानापूर येथील शिवस्मारकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आव्हान करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक आपल्या मातृभाषेच्या राज्यात सामील होण्यासाठी लोकशाही व सनदशीर मार्गाने मोर्चा, सत्याग्रह, आंदोलन, यासारख्या मार्गाने लढा देत आहेत. मात्र कर्नाटक सरकार मराठी भाषिक नागरिकांवर कांनडीचा वरवंटा फिरवून मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार करीत असले तरी अद्याप मराठी जनतेचा महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार कायम असल्यामुळे, येत्या एक नोव्हेंबर रोजी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हारताळ पाळून, आपली ताकद कर्नाटक सरकारला दाखवण्याचा निर्धार यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला.
या जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी सभापती मारुती परमेकर, माजी जि प सदस्य जयराम देसाई, सेवानिवृत्त मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले, मध्यवर्ती म ए समिती सदस्य राजाराम देसाई, मऱ्यापा पाटील, वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, भूविकास बँकेचा संचालक शंकर सडेकर, विठ्ठल देसाई, रवींद्र देसाई, मोहन देसाई, शंकर देसाई, विठोबा सावंत, हणमंत जगताप, संभाजी देसाई, मारुती देसाई, हणमंत देसाई, चंद्रकांत गुरव, किशोर राऊत, गुंडू गुरव, जयवंत कवठणकर, रामा गावडे, यांच्यासह बहुसंख्य म. ए. समिती कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta