
खानापूर : एक नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या ६८ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून, कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारी नंदगड येथे करण्यात आले.
यावेळी नंदगड बस स्थानक तसेच बाजारपेठेत जागृती फेरी काढून घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप करून मराठी भाषिकांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच शनिवारी काळ्यादिनानिमित्त खानापूर येथील शिवस्मारकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले. नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या ६८ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक आपल्या मातृभाषेच्या राज्यात सामील होण्यासाठी लोकशाही व सनदशीर मार्गाने मोर्चा, सत्याग्रह, आंदोलन, यासारख्या मार्गाने लढा देत आहेत. मात्र कर्नाटक सरकार मराठी भाषिक नागरिकांवर कानडीचा वरवंटा फिरवून मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार करीत असले तरी अद्याप मराठी जनतेचा महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार कायम असल्यामुळे, येत्या एक नोव्हेंबर रोजी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हारताळ पाळून आपली ताकद कर्नाटक सरकारला दाखवण्याचा निर्धार यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला.
या जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण, प्रवीण पाटील, मोहन गुरव, ब्रह्मानंद पाटील, रुक्मण्णा झुंजवाडकर, विठ्ठल गुरव, ज्ञानेश्वर गुरव, ज्ञानेश्वर बिडीकर, सेवानिवृत्त मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डी एम भोसले, मध्यवर्ती म ए समिती सदस्य राजाराम देसाई, यांच्यासह बहुसंख्य म. ए. समिती कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta