
खानापूर : इटगी येथील राणी चन्नम्मा शाळेच्या विद्यार्थ्यांचे दाखले न दिल्याच्या प्रकरणाने अखेर प्रशासन हादरले असून, गुरुवारी मध्यरात्री खानापूर शिक्षण विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांनी व पालकांनी बीईओ कार्यालयात ठिय्या धरत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रात्री 1.30 वाजता जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) स्वतः खानापूर येथे दाखल झाल्या, तर रात्री 11.30 वाजता नंदगडचे सीपीआय कार्यालयात आले. तब्बल रात्री 2.30 वाजेपर्यंत डीडीपीआय, बीईओ आणि पालकांमध्ये चर्चा सुरू होती.

मुख्याध्यापकांचा विरोध का? – पालकांचा सवाल…
राणी चन्नम्मा शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे दाखले देण्यास का विरोध करत आहेत, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
पालकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत “बीईओ व डीडीपीआयवर कोणाचा दबाव आहे?” अशी विचारणा केली. काही पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील साटेलोट्याचा संशय व्यक्त केला.
40 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित – दाखले न मिळाल्याने पालक आक्रमक…
दाखले न मिळाल्याने 40 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, संतप्त पालकांनी “दाखले मिळाल्याशिवाय आम्ही बीईओ ऑफिस सोडणार नाही” असा निर्धार व्यक्त केला.
रात्री उशिरापर्यंत पालक, शिक्षण अधिकारी आणि पोलिस यांच्यात चर्चा सुरू होती.
या बैठकीस डीडीपीआय मॅडम, बीईओ, सीपीआय नंदगड, पीएसआय नंदगड, सुर्यकांत कुलकर्णी, रायाप्पा बळगप्पनावर, दशरथ बनोशी, सुरेश भाऊ, केदारी सोनपन्नावर, नगरसेवक तोहीद चांदकन्नवर, पांडू पाटील पूर, विठ्ठल हिंडलकर, विठ्ठल केळोजी उपस्थित होते.
राजकीय दबाव की शिक्षणातील साटेलोटे?
या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण विभागातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजकीय दबाव, व्यवस्थापनाचा हट्ट आणि अधिकाऱ्यांचा मौन यामुळे निरपराध विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे.
“शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात एवढे घाणेरडे राजकारण कशासाठी?” असा सवाल पालक व नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta