
खानापूर : खानापूर तहसीलदार दुंडप्पा कोमार यांना एका आठवड्याच्या आत खानापूर तहसीलदार पदावरून मुक्त करावे आणि त्यांच्या जागी दुसऱ्या तहसीलदारांची नियुक्ती करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. एस. जी. पंडित आणि न्या. गीता के. बी. यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील विभागीय खंडपीठातून महसूल विभागाच्या सचिवांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.मनतुर्गा गावातील री. स. नं. १०८ मधील एकूण १७४ एकर २५ गुंठे जमिनीपैकी २ एकर २० गुंठे जमिनीचे बहुमालकत्व, नकाशा प्रमाणित करणे, हद्द निश्चित करणे, फोडी (उपविभाग), दुरुस्ती आणि पहाणी पत्राच्या ९ व्या स्तंभात आवश्यक बदल करण्याबाबत, न्यायालयीन प्रकरण क्र. ११४०८६/२०१९ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास खानापूर तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी दुर्लक्ष केल्याचा उल्लेख करत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तहसीलदार कोमार यांची खानापूरमधून तत्काळ दुसरीकडे बदली करावी. भू-दस्तावेज सहायक संचालकांनी चार आठवड्यांच्या आत सदर जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण करावे. त्यानंतरच्या १० दिवसांच्या आत खानापूर तहसीलदारांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच, या प्रकरणातील आरोपी क्र. १ दुंडप्पा कोमार यांनी १० डिसेंबर रोजी न्यायालयात स्वतः हजर राहावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta