Sunday , December 7 2025
Breaking News

हेमाडगा शाळेत साजरा झाला “आजींच्या मायेचा सोहळा”

Spread the love

 

खानापूर : भीमगड अभयारण्यातील हेमाडगा सरकारी शाळेत ‘आजींच्या मायेचा सोहळा’ हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आजी-नातवंडांच्या प्रेमळ नात्याला सन्मान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्र येऊन हा सोहळा संस्मरणीय केला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागताच्या गीताने व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा फुल देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिरोली केंद्राचे सी.आर.पी. आदरणीय बी. ए. देसाई सर, ज्ञानांकुर फाउंडेशनचे संचालक श्री. थॉमस डिसोझा सर, ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. नीलम मादार, तसेच एसडीएमसी उपाध्यक्षा सौ. श्रुतिका गावडा उपस्थित होते.

कार्यक्रमात मुलांनी आपल्या आजींच्या महत्त्वावर भाषणे सादर केली. काहींनी आजीवरील भावस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांना भावनिक केले. विद्यार्थ्यांनी ‘आजी म्हणजे घराचा आत्मा’ या विषयावर सुंदर गीत सादर करून सभागृहात आनंद आणि आपुलकीचे वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे ‘आजींचे पायपूजन’ नातवंडांनी आदराने आपल्या आजींचे पाय धुऊन त्यांना नमस्कार केला. अनेक आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
हा क्षण उपस्थितांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला.

मुख्याध्यापक श्री. किशोर शितोळे सरांनी कार्यक्रमाची संकल्पना, रूपरेषा आणि उद्देश सर्वांना सांगितले.

सी आर पी देसाई सरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजी म्हणजे संस्कारांचे शाळा आहेत. त्यांच्या अनुभवांतून मुलांना जीवनाचे खरे धडे मिळतात. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये कृतज्ञता आणि आदराची भावना वाढते.”
ज्ञानांकुरचे संचालक थॉमस डिसोझा यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आजच्या पिढीला आजींचे योगदान सांगितले.

शेवटी सर्व आजींना विद्यार्थ्यांकडून आदर आणि प्रेमाची भेट देण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्वांनी आनंदाने गप्पा, हशा आणि फोटोसेशनचा आस्वाद घेतला. यावेळी आजींचे मजेशीर खेळही घेण्यात आले. त्याला आजींनीही उत्साहाने प्रतिसाद दर्शविला.

हा कार्यक्रम ज्ञानांकुर फाउंडेशनच्या सहकार्याने पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वेदिका अय्यर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत पल्लवी देसाई तर आभार प्रदर्शन स्नेहा खांबले यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

लोंढा अरण्य खात्यातर्फे रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनदर्शन

Spread the love  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *