
भातपिकांचे नुकसान! नुकसानभरपाई व हत्ती बंदोबस्ताची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींचा कळप थैमान घालत असून, गावातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हलसाल येथील शेतकरी मारूती मष्णु तांबुळकर यांच्या ‘थोरले शेत (भटाच शेत)’ येथे हत्तींच्या कळपाने मोठे नुकसान केले आहे. त्यांच्या सुमारे वीस पोती भातपिकाचे हत्तीने पूर्णपणे चिरडून टाकले असून, हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
तसेच शेतकरी लक्ष्मण गंगाराम तांबुळकर यांच्या शेतातील सुमारे 10 पोती भातपिकाचे, तर कुमार-पंकज पुंडलिक तांबुळकर यांच्या शेतातील सुमारे 10 पोती भातपिकाचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले आहे. या घटनेमुळे गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हत्ती आपल्या शेताकडे येत असल्याची माहिती मिळताच गावातील दहा-पंधरा शेतकरी फटाक्यांच्या आवाजाने हत्ती पळवण्यासाठी फटाके घेऊन एकत्र आले होते. मात्र, हत्तीनी चतुराईने शेतकऱ्यांना चकवा देत, ते थांबलेल्या ठिकाणापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या मारूती तांबुळकर यांच्या शेतात घुसून नुकसान केले. शेतकऱ्यांना याची कल्पनाच झाली नाही आणि काही वेळातच त्यांनी आपले पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले.
स्थानिक शेतकऱ्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची व नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta