
खानापूर : खानापूर – लोंढा राष्ट्रीय महामार्गावर तिओली क्रॉसजवळ रविवारी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरीण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील तिओलीवाडा येथे रस्ता ओलांडत असताना हरणाला वाहनाची धडक बसल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे संबंधित अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विभागाचे सहाय्यक वनपाल राजू पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला त्यानंतर उपवनसंरक्षक सुनिता निम्बर्गी तसेच लोंढा वनविभागाचे वनक्षेत्रपाल वाय. पी. तेज यांनी पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व वनविभागाच्या देखरेखीत मृत हरणावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर वन्य प्राणी सुरक्षितपणे रस्ता ओलांडून जाऊ शकतील यासाठी भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु वन्यप्राणी महामार्गावर वावरत असल्यामुळे वन्य प्राण्यांच्या बाबतीत रस्ता दुर्घटनांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाची चिंता वाढली आहे. खानापूर तालुका हा जंगल भाग असल्यामुळे या महामार्गावरून जाताना वाहन चालकाने वाहने चालवताना सावधानगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहन चालकाने आपल्या वाहनाच्या गतीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta