

शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन
खानापूर : गोवा सायन्स सेंटरमिरामार, पणजी गोवा डिस्ट्रिक्ट सायन्स सेंटर, गुलबर्गा, ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स ऑन व्हील आणि ज्ञान प्रबोधिनी, पुणे निर्मित व्हर्च्युअल रिॲलिटी या उपक्रमातून खानापूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार प्रसार सुरू असून आजतागायत तालुक्यातील निम्म्याहून अधिक भागातील शाळांमधील शिक्षक व हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
मूळ मेंढेगाळीचे सुपुत्र, महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक पांडुरंग काकतकर यांच्या संकल्पनेतून गोवा,महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या त्रिवेणी संगमातून होत असलेल्या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागात विद्यार्थांना मनोरंजनाबरोबरच विज्ञान विषयात रूची वाढावी तसेच आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानात आपला तालुका अग्रेसर व्हावा यासाठीचा हा प्रयत्न आहे गेल्या महिनाभर सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष कृतीयुक्त लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला असून विज्ञान प्रदर्शनातील विविध प्रयोग तसेच व्हर्च्यूअल रिॲलिटी अर्थात आभासी प्रयोगांचा आनंदही घेतला आहे. या उपक्रमांसाठी लोक प्रतिनिधी, शिक्षण विभाग, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी व विज्ञानपप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत असून प्रसार माध्यमांचेही अमूल्य सहकार्य लाभत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, नावीन्यपूर्ण अनुभव देणारा हा उपक्रम राबविण्यासाठी ज्या शाळांनी विशेष परिश्रम घेतले अशा शाळांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी मूळ खानापूर तालुक्यातील पुणेस्थित उद्दोजक यांचे बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे सदर शाळांना गौरविण्यात आले. गुरुवार दि 20 नोव्हेंबर रोजी शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल सभागृह खानापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर, क्षेत्रीय शिक्षणाधिकारी पी.रामाप्पा, बी.आर.सी. समन्वयक एम.जी. हत्ती, एम.डी.एम व्हि.ए. जकाती, शंकर कम्मार, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष तथा सायन्स ऑन व्हील उपक्रमाचे समन्वयक पांडुरंग काकतकर, बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष दत्ता भेकणे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनिल चिगुळकर, बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन खजिनदार, प्रशांत गुंजीकर, सचिव नामदेव पाटील, संचालक शंकर गुरव, ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्रच्या प्रमुख,प्रमुख पल्लवी पराडकर, ज्येष्ठ पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, वासुदेव चौगुले, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील ज्या शाळांची या उपक्रमासाठी निवड झाली त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन पुणेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच या महिनाभर सुरू असलेल्या कार्यक्रमाचे उपक्रम समन्वयक पांडुरंग काकतकर यांचा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणेस्थित उद्योजक बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनचे सचिव नामदेव पाटील, खजिनदार प्रशांत गुंजीकर, संचालक शंकर गुरव यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा यांनी मार्गदर्शन केले व उपक्रमांस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास तालुक्यातील विज्ञानप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश सडेकर यांनी केले व आभार सुनिल चिगुळकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta