
खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करून आपला निषेध नोंदवीत असते. यावर्षी देखील 8 डिसेंबरला कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव होणार आहे व त्याच दिवशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याला मराठी माणसाने बहुसंख्येने उपस्थित रहावे यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर तालुक्यात सर्वत्र जनजागृती करण्यात येत आहे. आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नंदगड येथे जाऊन नंदगड बाजारपेठ व घरोघरी पत्रके वाटून जनजागृती केली.
जनजागृतीवेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, म्हात्रु धबाले, राजाराम देसाई, रणजीत पाटील, विनायक चव्हाण, विठ्ठल गुरव, महादेव कुंभार्डा, सिद्धाप्पा पाटील, श्याम सुतार, प्रवीण पाटील, यादव पाटील, संतोष मिराशी, अशोक देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta