
खानापूर : हलशी, हत्तरवाड, मेंढेगाळी, हलगा, कीरहलशी, मेरडा, करजगी, बस्तवाड, सुल्लेगाळी व नागरगाळी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे वाहतुकीचा मार्ग नव्हे तर “दररोज मृत्यूकडे नेणारा राजमार्ग” बनला आहे. या रस्त्यावरून दररोज खानापूर, बेळगाव, नंदगड या भागात नोकरी, व्यवसायानिमित्त शेकडो वाहन चालक ये-जा करीत असतात. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी काहीशी परिस्थिती या मार्गावर बनली आहे. वाहन चालकांना अक्षरशः देवाचे नाव घेत वाहन चालवावे लागते. आजपर्यंत जवळपास चार ते पाच निष्पाप नागरिकांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत. ग्रामपंचायत सदस्यांपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार, खासदार या सर्वांना वेळोवेळी निवेदने देऊन देखील या रस्त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. या रस्त्यासंदर्भात येथील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन झाली. या रस्त्याच्या पुनर्निर्मितीचे ठराव देखील पास झाले. त्याच्या बातम्या आणि फोटो सेशन्स देखील झाले. मात्र कृती शून्य आहे हलशी- नागरगाळी रस्ता मंजूर होईपर्यंत तात्पुरती डागडुजी करण्यात यावी. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. त्याचप्रमाणे गतिरोधक, रस्त्यावर प्रकाश व्यवस्था आणि सूचनाफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी हलशी, नागरगाळी भागातील नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta