
खानापूर : खानापूर पोलिस स्थानकात चाललेल्या गैरकारभारामुळे गुन्हेगारांना अभय तर सामान्य नागरिकांना त्रास अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
खानापूर पोलीस स्थानकात चालू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत ब्लॉक काँग्रेसकडे अनेक तक्रारी आल्या असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दिसून येत आहे. याबाबत पोलीस अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात खानापूर पोलीस स्थानकात आलेल्या तक्रारदारांना योग्य वर्तणूक मिळाली नाही तर ब्लॉक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. मागील काही महिन्यापासून खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांवरच पोलिसांकडून अरेरवी केली जात असल्याची माहिती काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना उपलब्ध झाली आहे. अनेक वेळा तक्रारदारांना ताटकळत ठेवण्यात येते व तक्रारदाराची बाजू ऐकून न घेताच त्यांच्या विरोधातच कारवाई होईल अशा पद्धतीची भीती तक्रारदाराच्या मनात घातली जाते आणि तक्रारदारांना माघारी पाठवले जात असल्याचा आरोप खानापूर पोलीस स्थानकावर करण्यात येत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये गुन्हेगारांशी संगनमत करून आर्थिक साठे लोटे केल्याचे बोलले जात आहे. सामान्य जनता न्याय मिळविण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असते परंतु खानापूर तालुक्यात पोलिसांकडून न्याय मिळण्याऐवजी अन्याय सहन करावा लागत असल्यामुळे पोलीस प्रशासनाबाबत खानापूर तालुक्यात नागरिकांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. तालुक्यात जमीन घोटाळे, अवैद्य धंदे, गांजा व इतर अमली पदार्थांची खुलेआम चाललेली उलाढाल. अनाधिकृत क्लब क्रिकेट, बेटिंग, मटका, ऑनलाईन जुगार या सर्व बाबींकडे खानापूर पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी आणि अभय जास्त अशी स्थिती खानापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. खानापूर शहरासह ग्रामीण भागात पोलिसांचा वचक राहिलेला नाही त्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. पोलिस स्थानक आर्थिक साठे लोट्याचे केंद्र बनल्याचा गंभीर आरोप पोलीस स्थानकावर ब्लॉक काँग्रेसने केला आहे. सामान्य जनता, शेतकरी व कष्टकऱ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस खपवून घेणार नसून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta