
खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १२०० टन ऊस भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत परिसरातील शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी शेतातील जमीन ओली असल्याने अग्निशामक दलाच्या गाडीला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परिणामी आग वेळीच आटोक्यात आणता आली नाही. आग विझवण्यास उशीर झाल्याने अंदाजे १२०० टन ऊस पूर्णतः भस्मसात झाले.
या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. ऊस हे प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याने या घटनेचा फटका शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवरही बसला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर खानापूर तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta