Tuesday , March 3 2026
Breaking News

हलगा (खानापूर) ग्रामस्थांच्या वतीने हलशी येथे श्री महालक्ष्मी देवीला ओटी अर्पण; उद्या भव्य कार्यक्रम

Spread the love

 

हलगा : “हलगा माहेर… मेरडा आजोळ… आणि हलशी सासर” ही केवळ शब्दरचना नसून पिढ्यान्‌पिढ्या जपलेली श्रद्धा, परंपरा आणि भावनिक नाळ आहे. याच परंपरेनुसार शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी हलगा गाव पंचकमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने हलशी येथील श्री महालक्ष्मी देवीला ओटी (आहेर) अर्पण करण्याचा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्री महालक्ष्मी देवी ही हलगा गावची कन्या मानली जाते. त्यामुळे माहेरवाशीयांच्या प्रेमाचा, मायेचा आणि कर्तव्याचा मान हलगा गाव प्रामाणिकपणे जपत आला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली ही सुवर्ण परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून, गावकुसाबाहेर न जाता गावमन एकत्र बांधणारा श्रद्धेचा उत्सव ठरते.

या परंपरेत मेरडा हे देवीचे आजोळ, तर हलशी हे सासर मानले जाते. आजोळातून येणाऱ्या आहेरात केवळ वस्तू नसून आशीर्वाद, आठवणी आणि ऋणानुबंध दडलेले असतात. तर हलशी येथे माहेरचा मान-सन्मानाने स्वीकार करून परंपरेनुसार देवकार्य पूर्ण केले जाते. या तिन्ही गावांना एकत्र बांधणारी श्री महालक्ष्मी यात्रा म्हणजे श्रद्धेचा उत्सव, एकतेचा सोहळा आणि परंपरेचा विजयघोष आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी ठीक 9 वाजता, हलगा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात संपूर्ण हलगा गाव एकदिलाने एकत्र येऊन देवीला आहेर अर्पण करणार आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नव्हे, तर जगण्यासाठी असल्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. देवीच्या आशीर्वादात स्वतःचा वाटा उचलण्यासाठी सर्वांनी कुटुंबासह वेळेत उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आवाहन श्री रणजीत कलाप्पा पाटील (अध्यक्ष, श्री लक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कमिटी) तसेच ग्रामस्थ पंचकमिटी, हलगा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“काम काही क्षण थांबू शकते, पण परंपरा थांबता कामा नये. हलगा हे महणमंगल देवीचे माहेर आहे आणि माहेरचे निमंत्रण कधीही चुकवायचे नसते,” असे भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *