शाळा सुधारणा कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे मागणी
खानापूर : लक्ष्मी यात्रेपूर्वी हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या विकासासाठी अनुदान मंजूर करावे अशी मागणी शाळा सुधारणा कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
मंगळवारी हलशी येथे बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार हलगेकर यांनी शाळा सुधारणा कमिटी व माजी विद्यार्थ्यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हलशी येथे लक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हलशी आणि परिसरात अनेक विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र अनेक वर्षांचा इतिहास लाभलेल्या सरकारी मराठी शाळेच्या इमारतीची आणि परिसराची डागडूजी करणे आवश्यक आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शाळेच्या विकासासाठी हातभार लागल्यास येणाऱ्या काळात शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शाळेच्या रंगरंगोटीसह इतर कामांसाठी अनुदान मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर आमदार हलगेकर यांनी शाळांच्या विकासासाठी सर्व ते प्रकारचे प्रयत्न केले जात असून हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या विकासासाठी अनुदान मंजूर केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विशाल गुरव, शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. पाटील, मिलिंद देसाई, नरसिंग घाडी, लक्ष्मण पवार, निंगाप्पा बावकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta