
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून छ. शिवजयंती उत्साहात साजरी
खानापूर : छ. शिवरायांनी केवळ युध्दनीतीला महत्व दिले नाही तर समाज परिवर्तनाचा विचार दिला आहे. आजची परिस्थिती पाहता आज समाजाला केवळ शिवरायांच्या शौर्यगाथांची नव्हे, तर विचारांची नितांत गरज आहे. आजची विदारक परिस्थिती पाहता शिवरायांना गांभार्याने अभ्यासावे लागेल, असे प्रतिपादन म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले.
खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ३९६ वी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
शिवरायांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या पात्यालाही हात लावू नका आदेश आपल्या मावळ्यांना दिला होता. त्यांनी तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांचा विचार केला. आजची विदारक परिस्थिती पाहता छ. शिवरायांना अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवरायांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाईंनी मोलाचे योगदान दिले, पण आजच्या आईला आपल्या लेकरांना वेळ देता येत नाही. आजच्या माता मोबाईल आणि टी.व्ही.च्या जंजाळात अडकल्या आहेत, अशी खंत प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे बोलतांना ते म्हणाले, शिवरायांनी केवळ लढाया करून शौर्यच गाजविले नाही, त्यांनी समाजाला वेगळा विचार दिला. त्यामुळेच परदेशी लेखक-विचारवंतांनी त्यांच्या कार्याची दखल घेतांना त्यांच्यासारखा राजा जगाच्या पाठीवर दुसरा झाला नसल्याचा अभिमानास्पद उल्लेख केला. प्रत्यक्ष आपल्या देशात, आपल्या समाजात शिवरायांचे विचार कितपत रुजले आहेत, याचा विचार आपण घेतला पाहिजे. आगामी काळात शिवरायांचा विचार बानविण्याबरोबरच समाजात त्याची रुजूवात करण्यासाठी आपण कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे.
यावेळी म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणाने समारोप करतांना नारायण कापोलकर यांनी, आजची स्थिती अत्यंत बिकट बनली असल्याच्या पार्श्वभूमीवर समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी म.ए.समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, गर्लगुंजी कृषी पत्तीनचे माजी चेअरमन राजू सिध्दाणी, भाजप नेते भरमाणी पाटील, गर्लगुंजी ग्रा. पं. माजी सदस्य प्रसाद पाटील, भाजप नेते मोहन पाटील, सदानंद मासेकर, राजू जांबोटकर, अरविंद शेलार, प्रा. जाधव, विनायक मुतगेकर, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, नारायण भटवाडकर, नागेश कोलेकर, प्रतिष्ठानचे खजिनदार ईश्वर बोबाटे, सदस्य मऱ्याप्पा पाटील, विठ्ठल पाटील, बाबाजी पाटील, ॠतिक कुंभार आदींसह शिवप्रेमी नागरीक उपस्थित होते. सहसचिव प्रल्हाद मादार यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल चेतन लक्केबैलकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta