खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न चळवळीत १९५६च्या आंदोलनात आहुती दिलेले हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागाप्पा होसुरकर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. निडगल मुक्कामी माहेरगावी त्यांचे वास्तव्य आहे, गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून आहेत. ही बातमी समजल्यानंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील, माजी जि. पं. सदस्य विलासराव बेळगावकर, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, यशवंत पाटील इत्यादींनी श्रीमती नर्मदाबाईंची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी निडगलचे ग्रामस्थ नागेश चोपडे, शशिकांत कदम, परशराम कदम, दिगंबर देसाई, हणमंत पाटील इत्यादी मंडळी उपस्थित होती. श्रीमती नर्मदा होसूरकर यांच्याशी संवाद साधला असता सीमाप्रश्नाच काय झालं असा प्रश्न त्यांनी केला, यावरून सीमा लढ्यातील आपल्या पतीने दिलेल्या बलिदानाची आठवण करून त्यांनी दिली व त्या म्हणाल्या माझ्या हयातीत हा प्रश्न सुटला असता तर बरे झाले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …