
4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू
खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात बिनशर्त एकी झाली असल्याची घोषणा माजी ता. पं. उपसभापती मारुती परमेकर यांनी बैठकीतून केली. एकीसाठी हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती देवस्थानावर गुरुवार दिनांक २४ रोजी दोन्ही गटातील सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विचार मंथनानंतर त्यांनी ही घोषणा केली.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती दोन गट निर्माण झाले होते. परिणामी चळवळ बोथट झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यात नाराजी होती. चळवळीला मरगळ आल्याने कार्यकर्ते विखुरले गेले. दोन्ही गटात एकी व्हावी अशी इच्छा वारंवार जनतेतून उपस्थित होत होती. मात्र या-ना त्या कारणाने एकीच्या प्रक्रियेत खंड पडला होता. मागील महिन्यात दोन्ही गटातील सदस्यांनी एकीसाठी गाठीभेटी घेतल्या.
देवाप्पा गुरव यांच्या गटातील गोपाळ देसाई, निरंजन सरदेसाई, राजू पाटील या सदस्यांनी माजी आ. दिगंबर पाटील यांच्या गटाने नेमलेल्या आबासाहेब दळवी, शिवाजी पाटील आणि डी. एम. भोसले आदींच्या त्रिसदस्यीय समितीला दि. २४ रोजी बैठक घेण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीने गुरुवारी दुपारी २ वा. हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते.
तालुक्यातील म. ए. समितीत असलेले दोन्ही गट संपुष्टात येऊन एकी झाली आहे. येत्या ४ एप्रिल रोजी शिवस्मारकातिल सभागृहात दु. २ वाजता बैठक बोलाविण्यात आली असून त्यामध्ये कार्यकारिणीची पुनर्रचना यावर चर्चा होणार असल्याची माहिती परमेकर यांनी दिली.
यावेळी माजी आ. दिगंबर पाटील, देवाप्पा गुरव, गोपाळ देसाई, यशवंत बिर्जे, गोपाळ पाटील, विवेक गिरी, पांडुरंग सावंत, कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, सूर्याजी पाटील, माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, नारायण कापोलकर, धनंजय पाटील, किरण पाटील, मुरलीधर पाटील, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, विनायक सावंत, रणजित पाटील, माजी ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार आदींसह ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी झाल्यानंतर खानापूर तालुक्यातील एकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती त्याला गुरुवारी यश मिळाले आहे. आता बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यात एकी झाल्यामुळे भविष्यात सीमाभागातल्या मराठी जनतेच्या लढ्याला अधिक बळकटी मिळेल अशी आशा जनतेत व्यक्त होत आहे खानापूरच्या एकीने पुन्हा एकदा मराठी माणसात नवचैतन्य पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta