खानापूर (प्रतिनिधी) : संकल्प फाऊंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील चाफ्याचा वाडा येथील लोअर प्रायमरी शाळेला नुकताच भेट दिली आणि विद्यार्थांना मास्क व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय शाळेतील मूलभूत सुविधांची विचारपूस करून शाळेला होईल तेवढी मदत करण्याचा पुढाकार घेतला.
सुरूवातीला शाळेच्या सहशिक्षिका सौ. निलम शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.. संकल्प फाऊंडेशनच्यावतीने शाळेसाठी विद्या देवतेचे प्रतीक म्हणुन सरस्वती मातेचा फोटो भेट देण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक शंकर गावडा यांनी संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन समाजाची बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.. प्रथमतः दुर्गम भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून शिक्षणा विषयी आस्था निर्माण करण्याची गरज असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी प्राथमिक शिक्षण हा पाया असून तो भक्कम करण्यासाठी गुणात्मक शिक्षण हवे. ते निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये योग्य त्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी मदतीचे हात पुढे आले पाहिजेत..आणि त्यासाठीच संकल्प फाऊंडेशनने पाउल उचलले आहे, असे विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. टी. पाटील होते. तर उपक्रमासाठी संस्थेचे स्वयंसेवक गोविंद देवळी, चेतन देसाई, स्वप्नील मेलगे, प्रवीण वारिक, निलेश मांगेलकर, अर्चना कडेमनी, पूनम देसाई व पूजा अरेर उपस्थित होते. शेवटी सहशिक्षिका निलम शिंदे यांनी आभार मानले.
