खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील) गटाचे शिष्टमंडळ आज मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले. या बैठकीत एकी संदर्भात चर्चा करण्यात आली. सुरूवातीला मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नाच्या दाव्यासंबंधीची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर खानापूर समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी खानापूर म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेचा सविस्तर वृत्तांत मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला. त्याचबरोबर खानापूर तालुका समितीमध्ये एकी होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मध्यवर्तीने स्वतः लक्ष घालून विखुरलेल्या खानापूर समितीमध्ये एकी घडवून आणावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने भेटीदरम्यान केली आहे.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी खानापूर समितीच्या गोपाळराव देसाई गटाशी आपण चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून पुढील चर्चा करु असे आश्वासन दिले.
या बैठकीत एकीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्यामुळे खानापूरमधील समितीमध्ये नवा आशेचा किरण पाहायला मिळत आहे.
मध्यवर्तीचे माजी आमदार मनोहर किणेकर, वकील राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे आणि माजी महापौर मालोजी अष्टेकर हेही चर्चेत सहभागी झाले होते.
यावेळी विवेक गिरी, मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे, बाळासाहेब शेलार आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी नारायण कापोलकर, विठ्ठल गुरव, अर्जुन देसाई, डी. एम. गुरव, कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील, डी. एम. भोसले, विलास बेळगावकर, अनिल पाटील, अविनाश पाटील, विशाल पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, जयराम देसाई, कृष्णा मनोळकर, आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta