27 जूनचा मोर्चा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील गट) बैठक आज 20 जून रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबरराव पाटील हे होते.
प्रास्ताविक समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी केले.
यावेळी बैठकीचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे परिपत्रके मराठीतून मिळावी यासाठी कर्नाटक सरकारला जागे करण्यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला खानापूर समितीचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर दि.18 जून रोजी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन एकिसंदर्भात चर्चा करण्यात आली त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत आबासाहेब दळवी यांनी मांडला. तसेच मध्यवर्तीच्या आदेशावरून 27 जूनच्या मोर्चाची जनजागृतीची सुरुवात उद्या मंगळवारपासून जांबोटी विभागातून करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बुधवारी नंदगड विभाग, गुरुवारी गर्लगुंजी विभाग, शुक्रवारी कणकुंबी विभाग, शनिवारी लोंढा विभाग व रविवारी खानापूर शहरात अशी विभागवार जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी मुरलीधर पाटील, अनिल पाटील, शिवाजी पाटील, पुंडलिक पाटील, अर्जुन देसाई, डी. एम. गुरव, विठ्ठल गुरव, डी.एम. भोसले, विलास बेळगावकर, नारायण लाड, अमृत पाटील, ऍड.अन्द्रदे, इत्यादींनी आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, खानापूर समितीचे शिष्टमंडळ मध्यवर्तीकडे एकिसंदर्भात चर्चेसाठी गेले होते त्या दरम्यान सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच मराठीची होणारी गळचेपी थांबविण्यासाठी सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी मध्यवर्तीने 27 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे सीमालढ्याचाच हा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वांनी या मोर्चात सहभागी होणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे माझ्या नेतृत्वाखाली मध्यवर्तीने आयोजित केलेल्या मोर्चात खानापूर समिती सामील होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील मराठी जनतेला या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
बैठकीला यशवंत बिर्जे, पुंडलिकराव चव्हाण, महादेव घाडी, प्रकाश चव्हाण, डॉ. एल. एच. पाटील, शशिकांत सडेकर, मुरलीधर पाटील, तानाजीराव कदम, दीपक देसाई, मरू पाटील, नारायण कापोलकर, महादेव भरणकर, विवेक गिरी, ईश्वर बोभाटे, प्रल्हाद मादार, प्रदीप पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta