खानापूर : खानापुरातील मलप्रभा क्रीडांगणावर आज आंतरराष्ट्रीय योगदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रत्येकाने योगसाधना करण्याचे आवाहन केले. खानापूर शहरातील मलप्रभा क्रीडांगणावर खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका प्रशासनाचे विविध अधिकारी, शिक्षक, शालेय विध्यार्थी आणि योगप्रेमींनी उपस्थित राहून योगासनांचा सराव केला.
यावेळी योगसाधकांना संबोधित करताना आ. डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, केवळ शारीरिकदृष्ट्या स्वस्थ राहणे म्हणजे फिटनेस नव्हे, मानसिक दृष्ट्याही स्वस्थ असणे म्हणजे खऱ्या अर्थाने फिटनेस होय. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी योगसाधना महत्वाची आहे. दिवसभराच्या धावपळीतून प्रत्येकाने थोडा वेळ काढून योगसाधना केली पाहिजे. आकाराने जाड-बारीक कोणीही असो, त्याला योगासने करता येतात. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार योगासने करून स्वस्त आणि मस्त रहा असे सांगून त्यांनी सर्वाना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी तहसीलदार प्रवीण जैन, बीईओ लक्ष्मणराव यक्कुण्डी यांच्यासह सरकारी अधिकारी, शिक्षक, विध्यार्थी आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.