खानापूर (वार्ता) : भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर जिल्हा आणि खानापूर महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली.
खानापूर येथील रवळनाथ मंदिरामध्ये काल शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानापूर भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रेमा भंडारी, खानापूर महिला मोर्चा अध्यक्ष राजश्री देसाई, जिल्हा कार्यकारणी सचिव वासंती बडीगेर आणि खानापूर महिला मोर्चा प्रभारी उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्यावतीने आयोजित केल्या जाणार्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात काम करणार्या आशा कार्यकर्त्यांचा डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर जिल्हा आणि खानापूर महिला मोर्चा कार्यकारिणीचे सर्व सदस्य सभेला उपस्थित होते.
