खानापूर : तालुका खानापूर समितीकडून तालुक्यात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ मोर्चाची जोरदार जनजागृती- खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई, देवाप्पना गुरव, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई आणि युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, दत्तू कुट्रे, राजू पाटील, राजाराम देसाई, किशोर हेब्बाळकर यांनी घेतली जनजागृती मोहिमेत आघाडी घेऊन संपूर्ण तालुका 27 जूनच्या महामोर्चासाठी पिंजून काढला.
मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी आयोजित केलेल्या महामोर्चाची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज गर्लगुंजी विभागात जनजागृती करण्यात आली. आज सकाळी लक्ष्मी मंदिर गर्लगुंजी येथे गोपाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपरा सभा घेण्यात आली. उपस्थितांना महामोर्चाबद्दल निरंजन सरदेसाई यांनी माहिती सांगून आजपर्यंत गर्लगुंजी गावातील नागरिक कायम समितीच्या पाठीशी आहेत. यापुढेही असेच राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
खानापूर तालुक्यामध्ये या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मराठी भाषिकांचा प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे हा मोर्चा यशस्वी होईल असे सांगून युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
गोपाळ पाटील बोलताना म्हणाले, गर्लगुंजी गावातील जनता समितीच्या स्थापनेपासून या सीमा लढ्यामध्ये सहभागी आहे सीमा प्रश्नाविषयी प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये या गावातील नागरिकांचा सहभाग मोठा असतो. माजी आमदार वसंतराव पाटील हे बरीच वर्षे मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षस्थानी होते यामुळे समितीच्या संघर्षाची जाणीव आपल्या गावातील नागरिकांना आहे याची आठवण ठेवून या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतील, असे सांगून मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सुद्धा गर्लगुंजी गावचा समितीच्या लढ्यातील इतिहास सांगून मराठी भाषिकाकडून मोर्चाला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत व सरकारने आडकाठी भूमिका न घेता मराठी माणसाचे मौलिक अधिकार मिळवून द्यावेत असे सांगितले.
यावेळी समितीचे पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निडगल, बरंगाव, होसुर, कुप्पटगिरी, येडोगा, चापगाव, सिओली, हेब्बाळ कौदल, रूमेवाडी नाका, या ठिकाणी घरोघरी जाऊन महामोर्चाची जागृती करण्यात आली. काही ठिकाणी महामोर्चाबद्दल माहिती युवकांना देताना संवाद साधण्यात आला व प्रत्येक गावातील ज्येष्ठ मंडळी महामोर्चासाठी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पाण्णा गुरव, राजाराम देसाई, दत्तू कुट्रे, राजू पाटील आदी उपस्थित होते.