खनापूर : खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील देगाव मेंडील भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अतिशय दुर्गम अश्या भागातील ही गावे विकासापासून नेहमी वंचित राहिली आहे. लोकप्रतिनिधी याकडे कधीतरी लक्ष देतील का? या प्रतिक्षेत या भागातील लोक आहेत. ऐन पावसाळ्याच्या सुरवातीलाच रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या भागात रस्त्याची नितांत गरज आहे. जंगल भाग असल्यामुळे परिवहन खात्याच्या गाड्यांची देखील म्हणावी तशी सोय देगाव परिसरात झालेली नाही. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी एखादे खाजगी वाहन या भागातून खानापूरला येते. अन्यथा येथील जनतेला पायपीट करत हेमाडगा गावापर्यंत 6 कि.मी. यावे लागते.
रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून आबालवृद्धांना ये-जा करावी लागत आहे. रेशन आणण्यासाठी सुद्धा देगावच्या नागरिकांना हेमाडगा येथे यावे लागते. त्यामुळे या भागातील लोकाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दिवंगत आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता मात्र देगाव मेंडील हा परिसर जंगलव्याप्त प्रदेश असल्यामुळे वन खात्याने हा रस्ता थांबविला. त्यानंतर माजी आमदार अरविंद पाटील यांनी देगाववासीयांची फक्त अश्वासनावर बोळवण केली. आता तरी लोकप्रतिनिधी देगाव मेंडील रस्त्याकडे लक्ष देत का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta