खनापूर : रामनगर ते रुमेवाडी क्रॉस खानापूर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदनाद्वारे खानापूर तहसीलदारांकडे करण्यात आली.
माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले.
खानापूर -रामनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ प्रवाश्यांवर आली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचले आहे. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. प्रवाशी या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. खानापूर रामनगर मार्ग हा गोव्याला जाणारा मार्ग आहे त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अनेकवेळा मागणी करून देखील कोणत्याच राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष दिले नाही. तरी प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा म. ए. समितीने प्रशासनाला दिला आहे. 18 जुलै पूर्वी हा रस्ता दुरुस्त केला नाही तर रुमेवाडी क्रॉस येथे म. ए. समितीतर्फे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, नारायण कापोलकर, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta