खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूती मंदिर गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे.
मलप्रभा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू मारूती मंदिराच्या स्लॅब बुडला आहे. नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जर सतत मुसळधार पावसाने हजेरी लावली तर बघता बघता स्वयंभू मारूती मंदिर पूर्ण पणे पाण्याखाली जाणार आहे.
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी कणकुंबी भागात पावसाचा जोर कायम असतो. तालुक्यातील सर्वात जास्त पाऊस पडण्याची नोंद कणकुंबी व जांबोटी येथे होते.
त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढते. या कारणांमुळे या भागातील भात, ऊस पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. सध्या जांबोटी भागातील शिवारात पाण्याचा साठा वाढल्याने भात पिके कुजून जाण्याचा अंदाज शेतकरी वर्ग करत आहेत.