खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला.
याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी या रस्त्याच्या दुर्दशामुळे विद्यार्थ्यांना त्रास चुकलेला नाही. हे दाखवुन दिले.
सरकारने तयार माध्यान्ह आहार विद्यार्थ्यांसाठी शाळेपर्यंत पोहचवण्याची सोय केली आहे. मात्र गंगवाळी गावाला जाणार्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अशा खराब रस्त्यावरून वाहनाची ये-जा बंद झाली आहे. त्यामुळे माध्यान्ह आहार पुरवठा करणारे वाहन महामार्गावर थांबले. त्यामुळे बिचार्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटरहून जास्त अंतरावर असलेल्या महामार्गावर भांडी घेऊन जावे लागले. त्यातच पाऊस, रस्त्यावर खड्डे अशा परिस्थितीत चालत जाऊन माध्यान्ह आहार आणणे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रासाचे झाले.
खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत वाहने खराब रस्त्यामुळे गावापर्यंत जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
याची दखल तालुका लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे, असे मत भरमाणी पाटील यांनी व्यक्त केले. तेव्हा तालुक्यातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे. अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असेही ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta