खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, एसबीओएफ खत कारखान्यातून मोठ्या प्रमाणात येणार रसायनयुक्त धूर नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे गावात येत आहे. त्यामुळे गावातील वातावरण प्रदूषित झाले असून नागरिकांना श्वसनाचे रोग उद्भवत आहेत. प्रामुख्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होत आहे. गावात रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जनावरांना देखील धोका पोहचत असून कारखाना मालकाने याचा सारासार विचार करून हा कारखाना बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेऊ असा इशारा देण्यात आला आहे. ग्रा. पं. कर्मचार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी हणमंत पाटील, गजानन पाटील, सुरेश पाटील, किरण पाटील, रमेश भोसले, मष्णू भोसले, महेश पाटील, रवळू वांद्रेकर, शंकर भोसले, सुरेश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta