खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास निवेदन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले. खानापूर ते रामनगर पर्यंत हा महामार्ग निर्माण करण्याचे काम काही वर्षापासून या-ना त्या कारणाने रखडलेला आहे. या महामार्गावर अवलंबून असणाऱ्या आजूबाजूच्या 40 ते 50 खेडेगावातील नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, पावसाळ्यामुळे नागरिकांची अतिशय दयनीय व्यवस्था झालेली आहे. रस्ता खराब असल्यामुळे बऱ्याच वाहनांचा अपघात होऊन बऱ्याच वेळेला जीवितहानी सुद्धा झालेली आहे. गेल्या काही वर्षापासून हा रस्ता बनवण्याचे कंत्राट अशोका ग्रुपने घेतले होते. काही कारणास्तव हा रस्ता आज सुद्धा झालेला नाही त्यामुळे प्रकल्प संचालकांच्या सांगण्यानुसार हा महामार्ग बनवण्यासाठी व्ही. बी. म्हात्रे इन्फ्रा या कंपनीला हा महामार्ग करण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून त्याच्यावर पॅचवर्क करण्यात येणार आहे व काही महिन्यात या महामार्गाचे संपूर्ण काम करण्यात येणार आहे, अशी ग्वाही संबंधित अजित नामक अधिकाऱ्याने दिलेली आहे. खानापूर शहरापासून ते गोवा क्रॉस पर्यंत असणाऱ्या महामार्ग रस्त्याची अतिशय खराब अवस्था झालेली आहे. रूमेवाडी नाक्यापासून ते गोवा क्रॉस पर्यंत भरपूर मोठे खड्डे पडल्यामुळे प्रत्येक दिवशी अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून हा सुद्धा महामार्ग नूतन करावा व सध्या पॅचवर्क करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदन देतेवेळी सांगण्यात आले.
एक निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांना सुद्धा पाठवण्यात आली. यावेळी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पी. एच. पाटील, बळीराम पाटील, निरंजन सरदेसाई, राजू पाटील, राजाराम देसाई, भुपाल पाटील, किशोर हेब्बाळकर आदी उपस्थित होते.