भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न
खानापूर : बहुग्राम पेयजल प्रकल्प योजनेसाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 2018 पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना त्यांना यश आले असून देगाव पेयजल प्रकल्पासाठी 565 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भाजपने याचे श्रेय फुकटात लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला खानापूर काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी यांनी लगावला.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी देगाव पेयजल प्रकल्प योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले होते. याला विरोध दर्शवत काँग्रेसने यासंदर्भातील पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. याचसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी यांनी सांगितले की, प्रथमत: आमदार अंजली निंबाळकर यांनी नंदगड, बिडी आणि मोदेकोप्प या तीन गावांसाठी बहुग्राम पेयजल योजनेचा प्रस्ताव ठेवला होता. या योजनेसाठी अधिकार्यांनी 250 कोटींचा आराखडा तयार केला होता. या प्रकल्पात जलस्त्रोतांचा विचार केला जात नसल्याची बाब आमदार निंबाळकरांनी निदर्शनास आणून दिली. 24 तास पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने जलस्त्रोत जोडून प्रकल्प तयार करण्याची सूचना केली. त्यामुळे सुधारित आराखड्यात जलजीवन अभियानांतर्गत जुन्या बहुग्राम पेयजल योजना प्रस्तावात गावांचा समावेश करण्यात आहे. तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींमधील 136 गावांना 24 तास पाणीपुरवठा केला जाईल, मात्र भाजप सरकारने मंजुरीशिवाय काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपल्या कार्यकाळात काय केले? याचे उत्तर आधी जनतेला द्यावे आणि नंतर काँग्रेस आमदारांच्या कामाबद्दल बोलण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान महादेव कोळी यांनी केले. रस्ते, गटारी म्हणजे विकास नाही असे भाजप नेते म्हणतात. परंतु इतकेच नाही तर 15 कोटी रुपयांच्या निधीतून महिला आणि बालरुग्णालय, 7.5 कोटी रुपये खर्चातून हायटेक बसस्थानक, 16 कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेले वीज पुरवठा केंद्र हि विकासकामे तुम्हाला दिसत नाहीत का? शासकीय रुग्णालयांचे विस्तारीकरण, पाणी योजना, बिडी येथील पदवीधर महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळा, नंदगड येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत, बिडी, जांबोटी व खानापूर येथे नवीन शेतकरी संपर्क केंद्र, दोन हजारांहून अधिक घरांना मंजुरी हि विकासकामे नाहीत का? असा सवाल महांतेश राऊत यांनी केला.
या पत्रकार परिषदेला मधू कवळेकर, रियाज अहमद पटेल, अनिता दंडगल, गीता अंबडगट्टी आदींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.