भव्य मोर्चाने तहसीलदाराना निवेदन
खानापूर : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आज रोजी खानापूर येथे महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील समादेवी गल्लीतील समादेवी मंदिरापासून झाली. मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देण्यात आले
शहरातील महिलांनी आपली शेतीची अवजारे फावडा, बुट्ट्या, पिकास, कुदळ, खुरपी घेऊन या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी निवेदनाचा स्वीकार करून तहसीलदार प्रवीण जैन म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांनां जो रोजगार पंचायतीमार्फत देण्यात येतो त्याचप्रमाणे शहरातील लोकांनारोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन मला देन्यात आले आहे. मी जातिनिशी लक्ष घालून वरिष्ठांना ताबडतोब हे निवेदन पाठवून पाठपुरावा करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.
त्याबरोबर वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, शहरातील बेरोजगारी कोणाच्या नजरेत जरी नसली तरी परिस्थिती खूप वाईट आहे. शहरालगतच्या महामार्गाने एक दोन एकर शेती कसून पोट भरणाऱ्या रोजगार शेतकऱ्याचा घास हिरावून घेतला आहे. गेल्या दोन वर्षात शहरावरती महापुराचे डोंगरा एव्हढे संकट येऊन गेले आहे. कोरोना महामारीनंतर छोटेमोठे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. या सर्व कारणामुळे शहरातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी रेवनसिद्धय्या हिरेमठ यांनी पुढाकार घेतल्याने बेरोजगारांना आशेचा किरण दिसत आहे. अशा कार्यात नेहमी आमचे सहकार्य असेल असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले.
यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी बाबासाहेब माने, निधर्मी जनता दलचे राज्य कार्यकारिणी सदस्य रेवणसिद्धय्या हिरेमठ, रवी काडगी आणि वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, बाळू चिनवाल प्रिया पाटील, रेखा गुरव, ऍड. एस. के. नंदगडी यासह शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta