खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील मीलाग्रेस चर्च शाळेत झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. प्राथमिक विभागाच्या मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर, सचिन प्रभाकर डिगेकर, गुरुप्रसाद संजय गावकर तर मुलींच्या गटातून सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर, मलप्रभा मारुती गुरव, वर्षा विलास मेंडीलकर हे विजयी झाले असून पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी खानापूर तालुक्याच्या संघातून निवड करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक विभागातून अबनाळी गावचे तसेच शिरोली हायस्कूलचे अश्विनी परशराम गावकर व महादेव विलास मेंडीलकर यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. एस. गुरव, रमेश कवळेकर, विजय पाटील, समीक्षा नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डिगेकर आणि गावकऱ्यांचे प्रोत्साहन मिळत आहे. भीमगड अभयारण्यामध्ये दडलेल्या अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या अबनाळीसारख्या खेड्यातून खानापूर तालुक्याच्या टीममध्ये नऊ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल अबनाळी शाळेचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. खानापूर तालुक्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची, पीइओ अधिकारी श्रीमती एस. एल. मिरजे, बीआरसी अधिकारी ए. आर. अंबगी, अक्षरदासोह अधिकारी महेश परीट, शिरोली सीआरपी बी. ए. देसाई यांनी अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta