खानापूर : हलशी ग्राम पंचायत हद्दीतील चारी गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून सर्व प्रकारची माहिती आणि कागदपत्रे मराठीतून द्यावीत अन्यथा येणाऱ्या काळात पंचायतीला जाब विचारला जाईल, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हलशी ग्राम पंचायतींना दिले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना मराठी कागदपत्रांसाठी निवेदन दिली जात आहेत.
हलशी ग्राम पंचायतीतर्फे कन्नड भाषेतून सरकारी कागदपत्रे व माहिती दिली जात असल्यामुळे गावातील नागरिक व मराठी भाषिक सदस्यांची अडचण निर्माण होत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी भाषिक 21 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. तसेच हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, भांबर्डा गावांमध्ये ९० टक्के पेक्षा अधिक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अल्पभाषिक कायद्यानुसार व न्यायालयाच्या आदेशानुसार पंचायतीकडून दिली जाणारी सर्व कागदपत्रे, परिपत्रके, नोटीस, कर पावती कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पंचायतीने कन्नड बरोबर मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा आमची मागणी वेळेत पूर्ण केल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मराठी भाषिक कोणत्याही प्रकारचा कर न भरण्याचे आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला. ग्राम विकास अधिकारी आर. जे. रेड्डर यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta