खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिका यांच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकाचा मोर्चा शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
यावेळी अंगणवाडी संघटनेच्या मेघा मिठारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडीच्या शिक्षिका व सहाय्यिकाना किमान वेतन व पेन्शन निर्वाह निधी योजना चालु करावी. अंगणवाडी केंद्रात एलकेजी व युकेजी वर्ग सुरू करावेत. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश दिले जावेत, अंगणवाडीतून शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना हस्तांतर पत्र प्रणाली आमलात आणावी, खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या अंगणवाडी कर्मचारी वर्गाला वैद्यकीय भरपाई देण्यात यावी, सादिलवार पैसे वाढवावे, आवश्यक अंगणवाडी केंद्रात शिक्षिका व सहाय्यिकाच्या रिक्त जागा भराव्यात, मराठी माध्यमच्या शिक्षिकांना बढती देण्यात यावी, मातृपूर्ण योजनेचे रेशन व्यवस्थित दिले जावेत, वरिष्ठ अधिकार्यांनी अंगणवाडी कर्मचारी वर्गाला सहकार्य करावे. तसेच प्रतिवर्ष गणवेश दिला जावा आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी उपतहसीलदार के. आर. कोलकार व के. वाय. बिद्री यांनी निवेदनाची स्वीकार करून सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मेघा मिठारी, भारती पै, जयश्री पेजोळी, जानकू देसाई, अनिता कोडोळकर, अनिता पाटील यांच्यासह शेकडो अंगणवाडी शिक्षिका, सहाय्यिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta