खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी खानापूर महामार्गावरील रामगुरवाडी गावाला जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाली.
येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर बेळगाव-पणजी महामार्गावर रास्ता रोको करू, असे निवेदन रामगुरवाडी गावच्या नागरिकांनी खानापूर जिल्हा पंचायत कार्यालय, तहसीलदार, तसेच पोलिस स्टेशनला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने खानापूर जांबोटी महामार्गावरील रामगुरवाडी क्रॉस ते रामगुरवाडी गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. परंतु चार महिन्यातच रस्त्याची दुर्दशा होऊन रस्ता चिखलमय झाला आहे.
इतक्या निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने नागरिकांना या रस्त्यावरून येजा करणे कठीण झाले आहे. तेव्हा येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण व्हावे. अन्यथा रास्ता रोको करू असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना रामगुरवाडी ग्राम पंच कमिटी अध्यक्ष मारूती माळवे, पुंडलिक मोटार, बाबू शिंदे, ग्राम पंचायत उपाध्यक्ष अंजली ठोंबरे, सदस्या दिपीका मोटार तसेच आकाश अथणीकर व रवी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी निवेदनाची स्विकार करून रस्त्याचे डांबरीकरण करू असे अश्वासन अधिकारी वर्गाने दिले.
Belgaum Varta Belgaum Varta