खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्रीक्षेत्र तपोभूमी – गोवा संचालित संत समाज – कुपटगिरी आयोजित श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागमाचे आयोजन कल्लाप्पा पाटील यांच्या गृहस्थाश्रमी सोमनाथ पाटील यांच्या यजमान पदाखाली सुसंपन्न झाले.
मंगलमूर्ती श्री गणरायाचं आगमन आपापल्या गृहस्थाश्रमामध्ये झालेलं आहे. आणि आपण मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं पूजन अर्चन करीत आहोत. सनातन वैदिक हिंदू धर्मात श्रीगणेश चतुर्थी उत्सवाला विशेष महत्व आहे. श्रीमहागणपती हा पूजेचा पहिला मानकरी आहे. हिंदूधर्म हा श्रेष्ठ सनातन धर्म आहे. द्विपद, चतुष्पद यासर्वांचा विचार आपल्या धर्मामध्ये झालेला आहे. हे सण, उत्सव आम्हांला हिंदू म्हणून टिकवून ठेवतात. वैदिक काळापासून ही संस्कृती चालत आलेली आहे, असे प्रतिपादन तपोभूमी गुरुपीठाचे वेदमूर्ती व्रजेश गुरव यांनी केले.
या संत समागमात स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरूकुलात खानापूर तालुक्यातील वेदाध्ययन करणारे बटु तन्मय पाटील, अभिजित पाटील व बालकृष्ण चव्हाण यांनी वेदमंत्रांच्याऋचा म्हटल्या व उपस्थित सर्वांना अथर्वशीर्ष शिकविले.
याप्रसंगी व्यासपीठावर धर्मप्रचारक विश्वास किरमटे, उद्गाता डाॅ. गौरेश भालकेकर, संत समाज कुप्पटगिरीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील आदि उपस्थित होते.
सद्गुरु पूजन, श्री सिद्धिविनायक महापूजा, हरिपाठ, भजन, प्रार्थना, श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, वेदमंत्र पाठ, दासबोध वाचन, दर्शन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta