खानापूर : अतिवृष्टीमुळे सन्नहोसुर ता. खानापूर येथील रेणुका तातोबा पाटील यांचे राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण अद्याप या महिलेला कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी स्थानिक आमदारांनी सदर महिलेला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
तोपीनकट्टी ग्रामपंचायत हद्दीतील सन्नहोसूर येथील रेणुका तातोबा पाटील यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले होते. घर कोसळल्यामुळे रेणुका यांचे जीवनोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. अतिवृष्टीमुळे घर कोसळल्याची माहिती ग्रामपंचायत पीडीओ आणि तलाठी यांना कळवून देखील अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. वारंवार विनंती करून देखील पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकारी देखील फिरकले नाहीत.
तातोबा पाटील यांची परिस्थिती बेताची आहे. ही नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे, त्यामुळे या कुटुंबाची परिस्थिती बिकट बनली आहे. तरी संबंधित अधिकारी व स्थानिक आमदार डॉ.अंजलीताई निंबाळकर यांनी लक्ष घालून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पाटील कुटुंब आणि गावकऱ्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta