खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या इदलहोंड गर्लगुंजी या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पावसाळ्यात रस्त्यावर चरी पडून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील इदलहोंड, गर्लगुंजी, निडगल, सिंगीनकोप, अंकले, तोपिनकट्टी, निट्टूर आदी गावच्या प्रवाशांना तसेच वाहन चालकाना प्रवास करणे कठीण होत आहे. तेव्हा रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन इदलहोंड, गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या वतीने इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, इदलहोंड -गर्लगुंजी रस्ता हा या परिसरातील नागरिकांसाठी, प्रवासासाठी तसेच मालवाहतूकीसाठी महत्वाचा रस्ता आहे. मात्र रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी इदलहोंड -गर्लगुंजी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी. तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधी याकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर, नंदू निट्टूरकर बजरंग दल अध्यक्ष, गोविंद किरमिटे विश्व हिंदू परिषदसंघटना अध्यक्ष, उदय पाटील ग्रा. पं. सदस्य, यल्लापा होसुरकर, लक्ष्मी नाईक, लक्ष्मी सुतार, सुमन कोलकार, नारायण पाखरे, यशवंत पाटील, सदानंद होसुरकर, अरविंद पाटील, संजय जाधव, प्रकाश जाधव, कृष्णा जाधव, सोमान्ना नागेनट्टीकर आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी अधिकार्यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.