खानापूर : तालुक्यातील सर्वात मोठी असलेली पिकेपीएस संस्थेची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा जांबोटी रोडवरील शुभम गार्डनच्या हॉलमध्ये अनेक नाट्यमय घडामोडींनी पार पडली. संस्थेला चालू वर्षी 30 लाखाचा नफा झाला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नारायण कार्वेकर हे होते.
संस्थेचे व्यवस्थापक अहवाल सादर करत असताना मधेच उठून शिवाजी पाटील यांनी मी कर्जासाठी मागणी केली असता हे व्यवस्थापक एलआयसी एजंट असल्याने मला यांनी पहिला पॉलिशी कर नाहीतर तुला कर्ज मंजूर करणे शक्य नाही असे म्हटले आहे, अशी वागणूक अनेक सभासदांना दिली जाते. पण आपलं काम थांबवतील या भीतीने कोण उघडपणे बोलत नाहीत, असे म्हणत गोंधळ घातला. उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवल्यानंतर शिवाजी यांच्या हातातील माईक काढून घेण्यात आला तरीपण ते परत माईक मिळवण्याचा आग्रह करीत होते. यावर व्यवस्थापक डी. ए. बेळगावकर यांनी मी एलआयसी एजंट असलो तरी अशी वागणूक कुणालाच दिलो नाही, असे प्रतिउत्तर देत पुढील अहवाल वाचण्यास सुरुवात करताच परत यशवंत गावडे यांनी संस्थेचे कापड दुकान तसेच संस्थेचे इतरांच्या तुलनेत कमी डिपॉझिट घेऊन गाळे का देण्यात आले आहेत. सरकारकडून मिळालेला ट्रॅक्टर शोभेची बाहुली म्हणून आहे का असे प्रश्न उपस्थित केले.
यावर बेळगावकर यांनी कापड दुकान नुकसान होत असल्याने बंद करण्यात आले आहे. ट्रॅक्टरला कोणत्याही शेतकऱ्यांनी मागणी केली नसल्याने तो जाग्यावर उभा असल्याचे सांगितले. दुकान गाळ्यांविषयी मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.
या सगळ्यात इतका गोंधळ उडाला होता की कोण काय बोलत आहे आणि त्याला काय उत्तर येतंय हे कळणं कठीण झाले होते.
यावेळळी डिसीसी बँक संचालक माजी आमदार अरविंद पाटील, जांबोटी पिकेपीएस चेअरमन धनश्री सरदेसाई, सुनीता बिर्जे, नारायण लाड, नारायण पाटील, अशोक पाटील, शारदा देवलतकर, परशराम ठोंबरे, सुरेश सुळकर, अमृत शिपुरकर, शंकर पाटील, राजाराम मादार आदींसह हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta