मुंबई : बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज (दि.30) शिवसेनेत प्रवेश केला आहे. याआधीही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मागच्या दोन महिन्यात शिवसेनेसोबत बंडखोरी करत संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच निर्णय घेतला यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनीच महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन बांधत त्यांनी स्वागत केले.
यावेळी शेकडो शिवसैनिक त्यांच्यासोबत होते. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांचा समाचार घेत सुनिल महाराज यांचे जोरदार स्वागत केले. आज सुनिल महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मला आनंद आहे. आपण म्हणत होतो की साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा. आता नवरात्रीतच सुनील महाराज इथे आले आहेत. बंजारा समाजाचे कडवट सैनिकही त्यांच्यासोबत आहेत.
मध्यंतरी आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण यांना जेव्हा लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेना प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे याचं भवितव्य घडवण्याची. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवीलाही मी जरूर जाईन, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta