ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मान या गावात गेली ६० ते ७० वर्षे सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोवा चोर्ला घाट बेळगाव या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मान गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या गावांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही चांगला रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही येथील रस्त्याची दुरुस्ती होत नाही कि डांबरीकरण होत नाही. पावसाळ्याच्या दिवसात या गावांमध्ये वाहने जाणे शक्य होत नाही. खराब व चिखलमय रस्त्यांमुळे कोणतीही वाहने गावात नेणे शक्य होत नाही. एखादे वाहन नेलेच तर पुन्हा परत आणण्यासाठी दोरीने बांधून ओढावे लागते रस्ता चांगला नसल्यामुळे येथील येथे वाहनांची ये-जा नाही. काही लोक अर्ध्यावाटेवर वाहणे ठेऊन गावात जातात. येथील विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर पायी अंतर चालत जाऊन जंगलभागातून हायस्कूल शिक्षणासाठी सुर्ल सत्तरी किंवा कणकुंबी येथील शाळेमध्ये ये-जा करावी लागते. रस्ता नसल्यामुळे गावात कोणतीही सुधारणा होत नाही. त्या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि येथील रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी ६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जवळपासच्या दहा ते बारा गावांमध्ये जागृती करण्यात आलेली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या रस्त्यासाठीच्या आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta