

जांबोटी विद्यालयाने राबविले गावोगावी उपक्रम
खानापूर : जांबोटी परिसरात अनेक खेड्यात नवरात्र उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला. या उत्सवादरम्यान जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक खेड्यात समतोल आहाराचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले. कापोली (के.सी.), कुसमळी, राजवाडा, रामापुर पेठ, हब्बनहट्टी, मुडगई, चिखले आदी खेड्यात भजन -प्रवचन, दौड, रास दांडिया सुरु असलेल्या ठिकाणी, विविध मंदिराच्या परिसरात जाऊन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी पोषण आहार तक्ते, रांगोळी नमुने, औषधी वनस्पती यांचे प्रदर्शन केले. समतोल आहाराचे महत्व, पोषक पदार्थाच्या अभावाने होणारे रोग, स्वच्छता, आहार घेण्याच्या पद्धती यांची माहिती ग्रामस्थांना दिली.
संपूर्ण सप्टेंबर महिना हा शासकिय पातळीवर पोषण मास म्हणून शालेय स्तरावर साजरा करण्यात आला. पण खेड्यातील पालकांना याची जाणीव झाल्यास सकारात्मक परिणाम होईल अशी संकल्पना मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी मांडली. विद्यार्थ्यांनी ती गावागावात जागृती अभियान राबवून यशस्वी केली. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta