नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते आबासाहेब दळवी यांनी केले. नागुर्डा येथील नवरात्रोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मण नांदूरकर होते.
पुढे बोलताना श्री. दळवी म्हणाले, आता रणमैदान जवळ असल्याने विविध राजकीय पक्ष आपण किती विकास केला याचे पाढे वाचत आहेत. मराठीला हरताळ फासलेला नेते भाषेवरून विकासावर आले आहेत. पण त्यांचा कावा वेळीच ओळखायला हवा. संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषिकांनी एकत्र येऊन भाषा संवर्धनाची प्रतिज्ञा केल्यास नवरात्रोत्सवाच्या नियोजनामागील हेतू सफल होईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन झाले. दीपप्रज्वलन माजी आमदार दिगंबर पाटील, भाजप नेते प्रमोद कचेरी, किरण येळ्ळूरकर, पंडित ओगले, भूविकास बँक चेअरमन मुरलीधर पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, दुर्गामाता ही स्त्रीशक्तीची प्रेरणा आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला अनन्य साधारण महत्व असून प्रत्येकाने स्त्रियांचा आदर राखावा. माजी आमदार अरविंद पाटील, पंडित ओगले, प्रमोद कोचेरी, किरण येळ्ळूरकर, दत्ता बेळगावकर यांनीही नवरात्रोत्सवाचे महत्व विशद केले.
यावेळी व्यासपीठावर सुरेश देसाई, चंद्रशेखर शेट्टी, अशोक पाटील, कृष्णा महाजन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील तर आभार प्रदर्शन विजय चापगावकर यांनी केले.
हळदी-कुंकू कार्यक्रम
नवरात्रोत्सव निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू आणि देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सविता महाजन होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. आवलाताई चोपडे, विना गावडा, विद्या बाबशेठ, सुनीता कटारे, ज्योती बुरुड, लक्ष्मी परीट, वैष्णवी सुलेभाविकर, ज्योती गुरव, सुनीता कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि विविध देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन झाले.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत आणि धनश्री सरदेसाई यांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रेणुका लक्केबैलकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनीता पाटील यांनी केले.
उत्सवानिमित्त दररोज भजन, आरतीचे आयोजन करण्यात आले. तसेच सांगली येथील हभप दिगंबर यादव यांचे कीर्तन झाले. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Belgaum Varta Belgaum Varta