खानापूर (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जाण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावातून गावोगावी दौरे काढून काळ्यादिनी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी लागलीच संपर्क दौऱ्याला प्रारंभ करू, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारक सभागृहात बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
तसेच २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करून तालुक्यातील वारकरींना बोलवून श्रेष्ठ किर्तनाचे आयोजन करण्यात येईल. त्याचबरोबर सकाळी ११ वाजता शिवस्मारक ट्रस्ट व हेमरस साखर कारखाना यांच्यावतीने आधुनिक शेती विषयावर मार्गदर्शन होणार आहे, असे सांगितले.
प्रारंभी तालुक्यात नुकताच समिती निष्ठावंतांचे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रास्ताविक महादेव घाडी यांनी केले.
तर यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, बाबूराव पाटील गुरूजी गर्लगुंजी, मुरलीधर पाटील, चंद्रकांत देसाई, आदींनी १ नोव्हेंबर काळादिनाबद्दल विचार मांडले.
बैठकीला जयसिंग पाटील अमृत पाटील, रमेश धबाले, शंकर पाटील, माजी जि. प. सदस्य नारायण कार्वेकर, जयराम देसाई, मल्हारी खांबले, कृष्णा मन्नोळकर, चंद्रकांत देसाई, मरू पाटील, दिगंबर देसाई, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे आदी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta