Saturday , October 19 2024
Breaking News

गोपाळ देसाई गटाचे आरोप बिनबुडाचे : बाळासाहेब शेलार

Spread the love

 

खानापूर : 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी खानापूर तालुक्यात जनजागृतीचे वारे दोन्ही गटातून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मंदिर खानापूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकी करणे ही काळाची गरज आहे. या हेतूने मागील आठवड्यात दोन्ही गटाच्या प्रत्येकी पाच सदस्यांची शिवस्मारक येथे एक बैठक झाली. मात्र या बैठकीत पदावरून मतभिन्नता झाली व ही बैठक बारगळली, असे गोपाळ देसाई गटातील सदस्य निरंजन सरदेसाई यांनी सांगितले.
निरंजन सरदेसाई, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, सुरेशराव देसाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना समिती नेते व माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार म्हणाले की, २४ मार्च २०२२ रोजी तीर्थक्षेत्र हब्बनहट्टी येथे खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटाची बैठक झाली आणि या बैठकीत दोन्ही गटाच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी जवळपास सहा तास विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व खानापुर तालुका पंचायतीचे माजी सभापती श्रीमान मारुतीराव परमेकर यांनी असे जाहीर केले की दोन्हीही गटाच्या कार्यकारिणी बरखास्त झाल्या. तसेच दोन्ही गटाची बिनशर्त एकी झाली असे जाहीर केले. याला राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री.आबासाहेब दळवी यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटाची बिनशर्त एकी झाली असा वृतांत २५ मार्च २०२२ रोजी दैनिक तरुण भारत, दैनिक सकाळ व दैनिक पुढारी तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आणि संपुर्ण खानापुर तालुक्यातील जनतेमध्ये नवचैतन्य पसरले. त्यानंतर दिनांक १ मे २०२२ रोजी शिवस्मारक येथे दोन्ही गटाच्या प्रत्येकी ८ अशा १६ सदस्यांची बैठक झाली. गावोगावी निर्धारसभा घेऊन कार्यकारिणीची निवड करण्याचे ठरविण्यात आले आणि पहिली निर्धार सभा हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या कुप्पटगिरी गावात घेण्याचे जाहीर करण्यात आले. ५ मे २०२२ रोजी सायंकाळी ठिक ७-०० वाजता निर्धारसभा आयोजित करण्यात आली. या सभेला समितीचे ज्येष्ठ नेते श्री. देवाप्पाना गुरव व त्यांचे चिरंजीव मारुती गुरव उपस्थित होते. मात्र दुसऱ्या गटाचे सदस्य या निर्धारसभेला का अनुपस्थित राहिले याचा त्यांनी आधी खुलासा करावा.
त्यानंतर माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, नारायणमामा लाड, जयराम देसाई, नारायणराव कारवेकर, बाळाराम शेलार, आबासाहेब दळवी, यशवंतराव बिरजे, मुरलीधर पाटील, नारायणराव कापोलकर, विवेक गिरी, डी. एम. भोसले, वसंतराव नावलकर, लक्ष्मणराव कसरलेकर, रूक्माना झुंजवाडकर, मरु पाटील, रमेश धबाले, अर्जुन देसाई, रमेश देसाई, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, विठ्ठल गुरव, शंकर पाटील यांनी ठरल्याप्रमाणे निर्धार सभा अनेक गावामधून घेतल्या आणि समितीनिष्ठ जनतेने प्रामाणिकपणे साथ दिली. अशाप्रकारे एकीची प्रकिया सुरू असताना केवळ ६ ते ७ जणांनी कुणालाही विश्वासात न घेता आपल्या गटाच्या समितीच्या अध्यक्षपदी श्री. गोपाळराव देसाई यांची निवड केली हे योग्य आहे का? मग एकीमध्ये आडकाठी कुणी आणली, हे यांनी प्रामाणिकपणे सांगायला हवे. या निवडीला श्री. मारुतीराव परमेकर यांनी विरोध करुन ठणकावून सांगितले की, एकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. दोन्ही कार्यकारिणी हब्बनहट्टी येथे झालेल्या बैठकीमध्ये बरखास्त केलेल्या आहेत, असे असताना पुन्हा निवड करणे योग्य नाही व सभात्याग केला. सदर वृत्तांतही दैनिकातून प्रसिद्ध झालेला आहे. अध्यक्षपदाची निवड दोन्ही गटाच्या नेत्यांनी बसून केली पाहिजे, तरच अध्यक्ष पदाच्या निवडीला वजन येईल, कारण हे पद फार जबाबदारीचे आहे. आज मला एवढेच सांगायचे आहे की, खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये अनेक वेळा मतभेद झाले. बंडखोरी झाली. परंतु त्यावेळच्या नेतेमंडळींनी वेळीच सावध होऊन पदापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा, सीमाप्रश्न, सीमा चळवळ, आपली मराठी भाषा सर्व श्रेष्ठ समजुन चार चार पाऊले मागे जाऊन स्वतःची पदे, नवीन, उमद्या, होतकरू, प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्त्यांना देऊन चळवळ जिवंत ठेवली हा आमचा इतिहास आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेऊन एकी केली तर भविष्य आहे, नाहीतर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही, असे माजी तालुका पंचायत सदस्य श्री. बाळाराम महादेवर शेलार यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *